डी. वाय. पाटील कृषि व तंत्र विद्यापीठ, तळसंदेच्या विद्यार्थ्यांचा केंद्रिय कृषि मंत्रांच्या हस्ते सन्मान…..

राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल (एनएएससी), भारतीय कृषी संशोधन परिषद (आसीएआर),नवी दिल्ली येथे आयोजित सातव्या अ‍ॅग्रीव्हिजन-2023 अधिवेशनामध्ये डी. वाय. पाटील कृषि व तंत्र विद्यापीठ, तळसंदेच्या अजित वारे आणि सौरभ बेनके या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम पोस्टर सादरीकरणासाठी पारितोषिक पटकाविले. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते या दोघांना सन्मानित करण्यात आलेकृषि व सलंग्न क्षेत्रातील संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या हेतूने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) दरवर्षी राज्य, प्रादेशिक तसेच राष्ट्रीय स्तरावर अधिवेशन आयोजित करते. या मोहिमेअंतर्गत राष्ट्रीय कृषी विज्ञान संकुल (एनएएससी), भारतीय कृषी संशोधन परिषद (आसीएआर), नवी दिल्ली येथे शुक्रवार, 5 मे रोजी सातव्या अ‍ॅग्री-विजन-2023 अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या अधिवेशनामध्ये ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या गटामध्ये डी. वाय. पाटील कृषि व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे कृषि अभियांत्रिकी पदवीच्या द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेत असलेल्या अजित अनिल वारे आणि सौरभ संजय बेनके या विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम पोस्टर सादरीकरणामध्ये पारितोषिक मिळविले आहे. त्यांनी ‘शाश्वत शेतीमध्ये नॅनोबायोसेन्सर्सचा वापर’ या विषयावर पोस्टरचे सादरीकरण करत परिक्षकांच्या प्रश्नांना शास्त्रोक्त आणि सविस्तर उत्तरे दिली. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्रसिंह यांच्या हस्ते मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) के. प्रथापन, कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत, कृषि अभियांत्रिकी विभागाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जयंत घाटगे, कृषिविद्या विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. विनायक शिंदे तसेच कृषि अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले. या यशाकरिता विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.नवी दिल्ली: केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना अजित वारे, सौरभ बेनके.